धर्मादाय सह आयुक्तांच्या आदेशातील मार्गदर्शक तत्वानुसार मुख्याध्यापक संघाच्या दैनंदिन कामकाजासाठी कार्यकारी मंडळाची बैठक : चेअरमन सुरेश संकपाळ
कोल्हापूर : प्रतिनिधी
मान.धर्मादाय सह आयुक्त यांच्या आदेशातील मार्गदर्शक तत्वानुसारच संघाचे दैनंदिन कामकाजासाठी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारी मंडळाची बैठक घेण्यात येऊन या बैठकीत संघ हिताचे निर्णय घेतल्याची माहिती संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ यांनी दिली.
विद्याभवन, कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची बैठक संपन्न झाली. अध्यक्षस्थानी चेअरमन सुरेश संकपाळ होते.
यावेळी बोलताना श्री.संकपाळ म्हणाले,
धर्मादाय सहआयुक्त यांच्या ६ ऑक्टोबर रोजीच्या आदेशाच्या चौकटीत राहून त्यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार संघाचे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे सुरु राहण्यासाठी कार्यकारी मंडळाची बैठक बोलविली होती पण काही विघ्नसंतोषी मंडळी संघाची नाहक बदनामी करुन सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. सभासदांनी त्यांच्यावर विश्वास ठेऊ नये.
यावेळी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचे संच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केल्याबद्दल संचालक जितेंद्र म्हैशाळे व त्यांच्या टीमचे अभिनंदन करण्यात आले.
संघाचे मासिक व वार्षिक सभांचे इतिवृत्त अधीक्षकांच्या कस्टडीत असणे बंधनकारक असतानाही सचिवांनी त्यांच्याकडे दिले नाही. तसेच संघाने ऑनलाईन शिक्षण प्रणालीसाठी खरेदी केलेले साहित्यही सचिवांनी परस्पर हडप केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे सर्वमताने ठरविण्यात आले. तसेच संघ कार्यालयातील वास्तव माहिती जाणून न घेता संघाची नाहक बदनामी करणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, व्हा.चेअरमन मिलिंद पांगिरेकर, व्हा.चेअरमन रविंद्र मोरे, सहसचिव अजित रणदिवे, खजाननिस नंदकुमार गाडेकर, लोकल ऑडीटर इरफान अन्सारी, सुरेश उगारे, श्रीकांत पाटील, पी.जी.पोवार, जितेंद्र म्हैशाळे, संजय देवेकर, जीवनराव साळोखे, एम. के. आळवेकर, बबन इंदुलकर, जी. के. भोसले, एस. आर. पाटील, सखाराम चौकेकर, पी.बी.भारमल, सौ. अनिता नवाळे व सौ. पी. आर. सरदेसाई आदी उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत संघाचे व्हा.चेअरमन मिलिंद पांगिरेकर यांनी संघाच्या कामकाजाचा आढावा अधीक्षक श्री. संजय पाटील यांनी घेतला. तर आभार सहसचिव अजित रणदिवे यांनी मानले.

Comments
Post a Comment