आगळा वेगळा विवाह समारंभ ठरला कौतुकाचा विषय...
कोल्हापूर ( प्रतिनिधी): इतिहासाचे स्मरण, हुतात्म्यांना वंदन, संविधानिक मूल्यांचे जतन, पर्यावरणाचे संवर्धन, आणि युवा पिढीशी संवाद साधत क्रांती प्रेरणा विवाह कोणत्याही धार्मिक विधी कर्मकांडांशिवाय संपन्न झाला.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व हुतात्म्यांचे स्मृतिप्रित्यर्थ पलूस तालुक्यातील बलवडी येथे ज्येष्ठ पर्यावरणवादी संपतराव पवार यांनी सन 1992- 93 साली शेकडो वृक्षांचे रोपण करून क्रांती स्मृतीवन उभारले आहे.
शाहू चरित्र अभ्यासक कराड येथील एडवोकेट संभाजीराव मोहिते यांचे चिरंजीव लेफ्टनंट कमांडर हर्षवर्धन आणि सुनीलराव पाटील यांची कन्या प्रियांका यांचा विवाह भारतीय ध्वज, राज्यघटना, महापुरुषांच्या प्रतिमा, यांना वंदन करून वृक्षरोपण आणि क्रांती वनातील वृक्षांना खतपाणी देऊन विवाह संपन्न झाला.
या विवाहप्रसंगी पलूस आणि कुंडल महाविद्यालयांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्याशी, भारतीय सैन्य दलातील बलस्थाने तसेच सैन्य दलातील अधिकारी भरतीसाठी घ्यावयाचे प्रयत्न या विषयावर विद्यार्थ्यां व पालकांसाठी विशेष संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या संवाद मेळाव्यात आयर्न मॅन विजेते बलराज पाटील आणि डॉक्टर दिग्विजय साळुंखे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि महाराष्ट्राचे उद्योग मंत्री कैलासवाशी जी डी पाटील आणि ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी कैलासवाशी गजाननराव बंडोजी पाटील यांचे स्मृती प्रित्यर्थ विशेष वृक्षरोपण ही करण्यात आले. या विवाह सोहळ्यात या हुतात्म्यांच्या माहिती पुस्तिकेचे ही प्रकाशन करण्यात आले. या विवाहामध्ये पारंपारिक घोडा, वाजंत्री, रोषणाई, सजावट तसेच सर्व धार्मिक विधी शिवाय संपन्न झालेला हा विवाह सोहळा सर्वांच्याच कौतुकाचा विषय बनला आहे.
केवळ आप्तगण आणि महाविद्यालय विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधत आणि पर्यावरण संविधानिक मूल्य इतिहासाचा स्मरण करत हा विवाह संपन्न झाला. या आगळ्या विवाहाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या विवाह साठी दोन्ही कुटुंबीयांनी आणि विशेषता वरवधूंनी संमती दर्शवल्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला नवा विचार देण्याचे कार्य पार पडले आहे असे मत ज्येष्ठ पर्यावरणवादी संपतराव पवार यांनी व्यक्त केले.

Comments
Post a Comment