अजितदादांचा काय होता आजचा दौरा...
बारामती: प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेत अजितदादांसह विमानातील एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना हा अपघात घडला. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी ७ वाजता मुंबईहून ८ आसनी चार्टर्ड विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी त्यांच्या आज चार प्रमुख सभांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८:४५ च्या सुमारास बारामती विमानतळावर विमान लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाडामुळे विमानाला भीषण अपघात झाला.
अपघातात ६ जणांचा मृत्यू
डीजीसीएने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात विमानातील कोणालाही वाचवता आले नाही. मृतांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे:
अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
विदीप जाधव (सुरक्षा रक्षक – PSO)
पिंकी माळी (सहकारी)
कॅप्टन सुमित कपूर (मुख्य वैमानिक)
कॅप्टन शांभवी पाठक (सह-वैमानिक)
आणि अन्य एक कर्मचारी.
प्रचारासाठी जात असतानाच काळानं घाला घातला
अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. त्यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार:
सकाळी १० वा. – निरवाघज
दुपारी १२ वा. – पंढरे
दुपारी ३ वा. – करंजेपूल
सायंकाळी ५:३० वा. – सुपा येथे त्यांच्या जाहीर सभा होणार होत्या. मात्र, पहिल्या सभेला पोहोचण्यापूर्वीच ही दुर्घटना घडली.
राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त
अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय नेत्यांसह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या चार दशकांपासून ते राज्याच्या राजकारणात सक्रिय होते. स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली पकड यामुळे त्यांची एक वेगळी ओळख होती. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांच्या अशा जाण्याने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Comments
Post a Comment