साखर कारखान्यात आता शासकीय वजन काटे बसणार....
जयसिंगपूर/पुणे (प्रतिनिधी)
राज्यातील साखर कारखान्यांमध्ये सुरू असलेल्या कथित काटामारी व रिकव्हरी चोरीच्या पार्श्वभूमीवर शासकीय वजनकाटे बसविण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. साखर आयुक्त संजय कोलते यांनी वैद्यमापन विभागाच्या नियंत्रकांना राज्यातील सर्व साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात शासकीय वजनकाटे उभारण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.राज्यातील अनेक साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काटामारी व रिकव्हरीत कपात करून आर्थिक लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट करत काही कारखान्यांकडून गैरप्रकार होत असल्याचे नमूद केले आहे.चालू गळीत हंगामात एकूण गाळप झालेल्या ऊसाच्या सरासरी वजनात सुमारे १० टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेतकरी, वाहतूकदार आणि ऊस तोडणी मजूर दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत.या पार्श्वभूमीवर प्रत्येक साखर कारखान्याच्या बाहेर जिल्हाधिकारी, साखर सहसंचालक, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आणि वजनमापे नियंत्रक यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र शासकीय वजनकाटा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी आमदार-खासदार स्थानिक विकास निधीतून खर्च करण्याचा पर्याय सुचविण्यात आला आहे. शासनाकडे निधी उपलब्ध नसल्यास संबंधित कारखान्याच्या गाळप झालेल्या ऊसातून प्रतिटन प्रमाणे खर्च कपात करून वजनकाटे उभारावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.राज्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये बसविण्यात येणारे वजनकाटे डिजिटल आणि ऑनलाइन प्रणालीद्वारे शासनाच्या मुख्य सर्व्हरशी जोडले जाणार आहेत. यामुळे वजन प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, चालू हंगामात ५०० टनांपेक्षा जास्त ऊस तोडणी झालेल्या शेतकरी व वाहतूकदारांची गावनिहाय यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही साखर सहसंचालकांना देण्यात आल्या आहेत.

Comments
Post a Comment