शंभरहून अधिक कोल्हापूरकर संकटात...
कोल्हापूर ( सागर चौगले-मुख्यप्रतिनिधी)
पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धस्थितीमुळे दुबई येथे कोल्हापूर व सांगलीतील पर्यटक अडकून पडले आहेत. याबाबत कोल्हापूर जिल्हा टूर ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सूरज नाईक यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.सुरज नाईक यांनी सांगीतले की, “कोल्हापूरमधील सुमारे १५० पर्यटक आणि सांगलीतील एका कॉर्पोरेट समूहातील २०० जण सध्या दुबईमध्ये अडकले आहेत. पश्चिम आशियातील युद्धामुळे विमानसेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांना परतीचा मार्ग मिळत नाही. त्यामुळे सर्वजण चिंतेत आहेत.” या शिवाय येत्या दोन महिन्यांत सुमारे २५०० पर्यटकांनी परदेश दौऱ्यांची नोंदणी केली आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे या सर्व सहली अनिश्चिततेच्या छायेत आल्या आहेत.नाईक यांनी सांगितले की, “मागील काही वर्षांपासून पर्यटन व्यवसाय सतत अडचणीत सापडत आहे. आधी कोरोना महामारीमुळे मोठे नुकसान झाले. त्यानंतर काश्मीरमधील दहशतवादी हल्ले आणि विविध देशांतील युद्धस्थितीमुळे पर्यटन क्षेत्रावर सातत्याने परिणाम होत आहे. व्यवसाय सावरत असतानाच पुन्हा नव्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.”दुबईत अडकलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना लवकरात लवकर मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा टूर ऑपरेटर असोसिएशनने केली आहे. तसेच आगामी सहलींबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, अशीही विनंती करण्यात आली आहे.दरम्यान, दुबईत अडकलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण असून प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Post a Comment