मंत्रालयात छत्रपती शाहू मील बाबत महत्वाच्या बैठकीचे आयोजन-आम.क्षीरसागर
सागर चौगले(मुख्य प्रतिनिधी)
कोल्हापूर दि.०२(प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराजांचे जन्म शताब्दी वर्ष म्हणून साजरे होत असताना छत्रपती शाहू मिल येथील स्मारकाचा कामास सुरवात व्हावी, अशी अपेक्षा समस्त शाहू प्रेमी आणि कोल्हापूर वासियांकडून व्यक्त होत असल्याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी लेखी पत्राद्वारे कळविले होते. त्या अनुषंगाने वस्त्रोद्योग मंत्रालयाने "कॅबिनेटसाठी प्रस्ताव मागवावा" असे निर्देश दिले होते. याच बरोबर अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोल्हापूर येथील छत्रपती शाहू मिल येथे प्रस्तावीत राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारून परिसर सुशोभित करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रस्ताव तात्काळ मागवून घेवून त्यास महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२६ मध्ये निधीची तरतूद करावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे आमदार क्षीरसागर यांनी केली होती. या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या कोल्हापूर येथील श्री. शाहू छत्रपती मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाकरिता जागेचे हस्तांतरण करणेबाबत वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंत्रालयात गुरुवार दिनांक ५ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. या बैठकीस आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव,कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त , वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त, सामान्य प्रशान विभागाचे उपसचिव, वस्त्रोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आदी उपस्थित राहणार आहेत.

Comments
Post a Comment