केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम लवकरात लवकर पुर्ण करा-अन्यथा आंदोलन..


 केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम कासवगतीने-बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीचा जनआंदोलनाचा इशारा.


कोल्हापूर (प्रतिनिधी) दिनांक २५:-

महाराष्ट्राच्या मुख्य सांस्कृतिक केंद्रांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूरचे केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीच्या भक्षस्थानी पडले. या घटनेला आता तब्बल दोन वर्षे पूर्ण होत आहेत.नाट्यकर्मींचा रेटा, कोल्हापुरातील संघटनांचा दबाव यामुळे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात झाली खरी.. परंतु अत्यंत कासव गतीने चालणारे हे काम प्रशासनाच्या सुस्तपणामुळे दिवसेंदिवस प्रलंबित पडत आहे. कोल्हापूरच्या जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणात होत असणारा विलंब हा रंगकर्मीबरोबरच कोल्हापूरच्या जनतेला वेदनादायी तसेच संतापजनक ठरणारा आहे.नाट्यगृहाच्या पार्किंगचे काम संपूर्ण रखडले आहे. नाट्यगृहातील बाहेरच्या परिसरातील कामे संपूर्णपणे ठप्प असून, नाट्यगृहाच्या आतील भागाचे नूतनीकरण अर्धवट अवस्थेत आहे. अतिशय संथपणाने काम चालू असल्यामुळे एक वर्षात हे नाट्यगृह पूर्ण होईल अशी प्रशासनाची घोषणा ही निव्वळ वल्गना ठरली आहे. स्वच्छतागृह, पार्किंगची सुविधा आणि त्याचबरोबर अंतर्गत सजावटीची कामे या कामांबाबतीत नाट्यगृहाच्या नूतनीकरणाची कोणतीही प्रगती झालेली नाही,कोल्हापूर महापालिका प्रशासनाने केशवराव भोसले नाट्यगृह या अनमोल सांस्कृतिक ठेव्याचा आदर करून प्रशासकीय पातळीवर पूर्ण प्रयत्न करून कोल्हापूरचे हे सांस्कृतिक वैभव लवकरात लवकर कोल्हापूरकरांच्या सांस्कृतिक जीवनामध्ये दाखल करणे गरजेचे आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम लवकर पुर्ण न केल्यास जनआंदोलन उभे करावे लागेल असा इशारा बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीचे संस्थापक किसनराव कल्याणकर, अध्यक्ष रामेश्वर पतकी, राजेश पार्टे, नितीन शेळके, मुसाभाई शेख, सतीश पोवार, प्रशांत डकरे, दीपक म्हेतर,प्रशांत बरगे, किरण भोसले, सुनील हंकारे यांच्यासह  समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.


Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...