भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता-कै.बाबा देसाई
सागर चौगले(कोल्हापूर ब्रेकिंग-मुख्य प्रतिनिधी):
कोल्हापूर महापालिकेत किंवा कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजप सत्तेवर येईल तसेच कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे आमदार होतील हे असे जर पंधरा वर्षांपूर्वी कोणी म्हटले असते तर त्याला वेड्यात काढले गेले असते. मात्र हे शक्य झाले ते भाजपच्या मोजक्याच पण कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्त्यामुळेच... असेच एक भाजपचे कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणजे दिवंगत विजय उर्फ बाबा देसाई... बाबा देसाईंनी आपली पूर्ण हयात भाजप पक्ष वाढीसाठी घालवली. जनसंघाच्या विचारावर चालणारे बाबा देसाई यांनी कधीही स्वार्थासाठी राजकीय तडजोड केली नाही. आणि म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे रुजवली गेलीत.जनसंघापासून ते भारतीय जनता पार्टीपर्यंतचा बाबा देसाई यांचा प्रवास म्हणजे संपूर्ण आयुष्य भाजपसाठी अर्पण केल्यासारखेच होते. असे म्हटल्यास वावगे ठरु नये. कोल्हापूर जिल्ह्यात ज्यांनी भाजपचा पाया रचला त्यापैकी एक सच्चा आणी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे बाबा देसाई होय. आज कोल्हापूर जिल्ह्यात भाजप यशाच्या शिखरावर असल्याचे जे चित्र दिसते ते बाबा देसाईं यांच्यासारख्या कार्यकर्त्यामुळेच. बाबा देसाईबरोबरच दिवंगत सुभाष वोरा, बाळासाहेब भोसले, संभाजीराव मुदगल, यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच कोल्हापूर जिल्ह्यात भाजप पक्ष जगला नाही तर सत्तेच्या सिंहासनावर विराजमान झालाय. भाजपने देखील बाबा देसाई यांचा सन्मान करत त्यांना गोकुळचे संचालक पदावर काम करण्याची संधी दिली होती. त्याच प्रमाणे त्यांच्या सुपुत्राच्या विवाह सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती यावरुन भाजप पक्षांमध्ये बाबा देसाई यांचे राजकीय वजन अधोरेखित होते. आज त्यांचा प्रथम स्मृतिदिन आहे. कैलासवाशी बाबा देसाई यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर ब्रेकिंगच्या वतीने विनम्र अभिवादन...

Comments
Post a Comment