आमदार सतेज पाटील-महाडिक गट एकत्र येणार?
आमदार सतेज पाटील-महाडीक गट एकत्र येणार?
कोल्हापूर : ‘बंटीसाहेब तुम्ही आणि महाडिक एकत्र येणार आहे, अशी कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा सुरू आहे, त्यातील खरे काय?’ असा चिमटा माजी आमदार के. पी. पाटील यांनी काढल्यानंतर ‘जर तुम्ही व ए. वाय. पाटील एकत्र येत असाल तर मग ‘बंटी व महाडिक’ का नाही? असे रोखठोख उत्तर आमदार सतेज पाटील यांनी दिल्याने उपस्थीतांना चांगलाच धक्का बसला.
कोल्हापूर बाजार समितीच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा बँकेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार संजय घाटगे, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, राजेश पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर आदींची नुकतीच एक बैठक झाली. बैठकीनंतर या नेत्यांमध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली, याची जिल्हाभर चर्चा रंगली आहे.'गोकुळ’च्या राजकारणाचा संदर्भात देत सतेज पाटील यांच्याकडे पाहत, ‘बरे केले, आमच्यात भांडणे लावून तुम्ही मजा बघत बसलाय’ असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. ‘माझे काय नाही, तुमचे महायुतीचे जोरात सुरू आहे, माझ्या तुमच्या महायुतीला शुभेच्छा आहेत’, असे आमदार सतेज पाटील म्हणताच, आम्ही महायुती म्हणूनच ‘गोकुळ’ची निवडणूक लढणार असल्याचे आमदार विनय कोरे यांनी सांगितले.तर "अमल महाडीक मला भेटतात पण आपणच भेटत नाही"असे विधान करुन आमदार सतेज पाटील यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवुन दिली आहे.
दरम्यान, कागलच्या राजकारणामध्ये कट्टर वैरी असणारे समरजीत घाटगे आणि मंत्री हसन मुश्रीफ एकत्र येऊ शकतात तर आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक एकत्र का येऊ शकणार नाहीत अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच ज्या गोकुळ दूध संघामुळे महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात दरी निर्माण झाली होती तोच गोकुळ दूध संघ आता महाडिक आणि सतेज पाटील एकत्र येण्यास कारणीभूत ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.



Comments
Post a Comment