कळंबा यात्रेला उत्सवाचे स्वरुप..
कळंबा गावच्या यात्रेला उत्सवाचे स्वरुप,राज्यभरातुन हजारो भावीकांची देवीच्या दर्शनासाठी उपस्थीती..
कळंबा (प्रतिनिधी): राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टी कोनातून वसलेले गाव म्हणजे 'कळंबा' हे होय. कळंबा गावाला अख्यायिका असून करवीर महात्म्यात कोल्हासूर राक्षसाने कात्यायनीच्या डोंगरावर श्री महालक्ष्मी देवीची उपासना केली होती. कोल्हासूर श्री महालक्ष्मी देवीचा निस्सीम भक्त होता, एक दैत्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास देत होता. या दैत्याचा वध श्री महालक्ष्मी देवीच्या वरदानाने कोल्हासूराने केला. या कोल्हासूराच्या पत्नीचे नाव कळंबादेवी, कळंबा देवीला तीन पुत्र होते. त्यातील एक पुत्र करवीरासूर हा होता. त्यामुळेच कोल्हापूरला करवीरनगरी असे संबोधले जाते. त्यानंतर करवीराचा माता व कोल्हासूराची पत्नी कळंबादेवी हिचे स्थान म्हणून कळंबा गाव निर्माण झाले.पूर्वी कात्यायनी शेजारी बालिंगा गाव होते.ह्या गावाच्या खालच्या बाजुला कळंबा तलावास लागुन जुन्या कळंबा गाव होते. गावात कळंबा देवीचे छोटेसे दगडी बांधकाम असलेले मंदीर होते. ते आजही त्या ठिकाणी असून विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. या ठिकाणी स्वयंभू स्वरुपातील मूर्ती असून या देवालयाची पूजा-अर्चा करण्यात येत असते. तलावाच्या हद्दीत मंदीर आहे. कळंबा तलावाची निर्मीती करत असताना कळंबा गाव हे तलावाच्या खालच्या बाजुला स्थलांतरीत करण्यात आले.त्यानंतर गावाच्या मध्यभागी श्री अंबाबाई मंदीराची स्थापना करण्यात आली. मंदीरात पाषाणाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पूर्वी हे मंदिर एका कौलारु इमारतीमध्ये होते त्यानंतर 2003 सालानंतर या मंदिराचा जिर्णोद्धाराचे काम सुरु करण्यात आले. कळंबा गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत भव्य आणि दिव्य मंदिर साकारले आहे. २००७ ला जिर्णोध्दाराचे काम पुर्ण झाल्यापासुन यात्रेचे आयोजन करण्यात येते. ही यात्रा म्हणजे सात दिवसाचा उत्सवच म्हणून साजरा करण्यात येतो.या उत्सवाला मोठ्या प्रमाणात स्वरूप प्राप्त झाले असून राज्यभरातून हजारो भक्त या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येतात. मंदीरात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यात्रेच्या समारोपाच्या दिवशी हजारो भावीकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. ही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी गावातील महालक्ष्मी अंबाबाई भक्तगण मंडळ, जेष्ठ नागरीक, विविध संस्था-संघटना,तालीमींचे पदाधिकारी,तरूण मंडळे, सामाजिक संस्था,सामाजीक कार्यकर्त्ये,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समीतीचे सदस्य, प्रशासन अधिकारी,सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य-पदाधिकारी, ग्रामसेवक,पोलीस पाटील यांच्यासह श्री महालक्ष्मी अंबाबाईचे असंख्य भावीकांचे मोलाचे सहकार्य लाभले.




Comments
Post a Comment